PCMC CRIME: नागरिकांवर दहशत गाजवून PCMC शहराला वेठीस धरणारी वृत्ती ठेचूनच काढावी…..

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहे. वेगाने नागरीकरण होणारे हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. शहराच्या सर्वच बाजूंनी मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असून, लोकसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीतही वाढ होत असल्याचे दिसून येते. शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. या पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ पोलीस ठाणी येतात. आयुक्तालयाचे एकूण कार्यक्षेत्र ११५ चौरस किलोमीटर इतके असून, अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या या कार्यक्षेत्रात येते. अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी, समाजमाध्यमावर होणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण आणि संघटित गुन्हेगारी हे सर्व रोखण्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शहरातील अनेक जुन्या गृहनिर्माण सोसायट्या, उपनगरांतील बैठी घरे, गावठाण भागांमध्ये वाहनतळाची व्यवस्था नाही. परिणामी, नागरिक रस्त्यावर, पदपथावर वाहने लावतात. या वाहनांना समाजकंटक लक्ष्य करत असल्याचे दिसते. दहशतीसाठी कोयत्याने वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान केले जात आहेपिंपरीगावातही सलग दोन दिवस वाहनांची तोडफोड झाली. पहिल्या दिवशी चार आणि दुसऱ्या दिवशी सहा वाहने फोडण्यात आली. रात्रीच्या वेळी तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ पुरेसे नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी गुन्हेगारांना वचक बसविणारे ‘पोलिसिंग’ करणे हेही महत्त्वाचेच आहे. नागरिकांवर दहशत गाजवून शहराला वेठीस धरणारी वृत्ती ठेचूनच काढावी लागेल. आरडाओरडा करत कोयते आणि दांडकी नाचवून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची विनाकारण तोडफोड करणारे, तोडफोडीला विरोध केल्यास ‘भाई’ असल्याचे सांगून नागरिकांच्या खिशातून पैसे काढणारे, खंडणी मागणारे, पिस्तूल हातात घेऊन ‘रील्स’ बनविणारे… असे अनेक तरुण सध्या समाजमाध्यमांतील दृश्यफितींतून समोर येत असतात. पिंपरी-चिंचवड शहरात असे ‘उद्योग’ सर्रास सुरू असतात. त्यामुळे उद्योगनगरीची गुन्हेनगरी होत आहे की काय, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेले वाहन तोडफोडीचे सत्र थांबविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Latest News