‘गंगोत्री होम्स’तर्फे पर्यावरण दिनानिमित्त पुरस्कार सोहळा

मेधा ताडपत्रीकर,अनिकेत लोहिया यांचा होणार गौरव

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘गंगोत्री होम्स’ या संस्थेतर्फे श्रीमती मेधा ताडपत्रीकर,अनिकेत लोहिया यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रक्कम रुपये प्रत्येकी पन्नास हजार असे आहे.

रविवार, दि.१५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता म.ए .सो . सभागृह (बाल शिक्षण मंदिर), मयूर कॉलनी, कोथरूड येथे ‘गंगोत्री होम्स पर्यावरण दिन पुरस्कार २०२५’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. ते ‘पर्यावरण व विकास यांचा समतोल’ या विषयावर विचार मांडतील.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ‘गंगोत्री होम्स’ या संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला ‘गंगोत्री होम्स’चे संचालक राजेंद्र आवटे,गणेश जाधव,मकरंद केळकर उपस्थित होते. या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पर्यावरण पुरस्कार उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

प्लास्टिक समस्या आणि जलसंवर्धनात योगदान :

या गौरव कार्यक्रमात दोन मान्यवर पर्यावरणप्रेमींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ‘गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्कार २०२५’ हा ‘रुद्र ‘संस्थेच्या श्रीमती मेधा ताडपत्रीकर यांना देण्यात येणार आहे .’मानवलोक’ या अंबेजोगाई येथील संस्थेचे अनिकेत लोहिया यांना ‘गंगोत्री होम्स जल पुरस्कार २०२५’ दिला जाणार आहे. पर्यावरण साक्षरता, निसर्गस्नेही शिक्षण, वृक्षसंवर्धन व जनजागृती यामधील दोघांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना दिला जात आहे.

रुद्र संस्थेच्या श्रीमती मेधा ताडपत्रीकर यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्याचे प्रक्रिया, पुनर्वापर करून त्याचा उपयोग इंधन निर्मितीसाठी करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यांच्या संशोधनातून कचऱ्याचे व्यवस्थापन सुलभ झाले असून समाजात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाली आहे.तर अंबेजोगाई येथील ‘मानवलोक’ संस्थेचे अनिकेत लोहिया यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी भूजल पुनर्भरणासाठी प्रभावी उपाययोजना राबवून अनेक दुष्काळग्रस्त भागांना संजीवनी दिली. त्यांच्या पाणलोट विकासाच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील गावांना जलसंवर्धनाचा आधार मिळाला आहे.या दोन तज्ज्ञांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडत असून त्यांच्या योगदानामुळे पर्यावरण आणि जलसंपत्तीच्या जतनाला चालना मिळाली आहे.

शाश्वत आणि पर्यावरण पूरक विकासाची २५ वर्षे !
बांधकाम व्यवसायात पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करत गंगोत्री होम्स ने पर्यावरणपूरक विकासाची रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे.पुणे शहरात पर्यावरणपूरक बांधकाम प्रकल्प आणि भोर तालुक्यात सेकण्ड होम्स याद्वारे त्यांनी शाश्वत विकासाची दिशा दाखवली आहे.गंगोत्री होम्स गेल्या काही वर्षांपासून नद्यांची स्वच्छता उपक्रम, जनजागृती मोहिमा, वृक्षारोपण,सायकल वाटप ,जुन्या गोष्टी आणि कपडे यांचा पुनर्वापर, कार्यशाळा यासारखे उपक्रम राबवत आहे. याच परंपरेतून या पुरस्कार सोहळ्याची संकल्पना आकारास आली आहे,अशी माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली..
……………………………………….

Latest News