मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक

1004761203

आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल भारतीय छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा* केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

पिंपरी, – राज्यातील सध्याचा सर्वात संवेदनशील असलेला मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत संतांच्या भूमीत मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय तात्काळ थांबवावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

काळेवाडी येथील इंदू लॉन्स याठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना नानासाहेब जावळे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.

याप्रसंगी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, केंद्रिय सहकार्यध्यक्ष भिमराव मराठे, प्रदेश महासचिव मनोज आण्णा मोरे, पश्चिम महाराष्ट्र मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम सुर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आशिष खंडेलवाल, सहकार्यध्यक्ष प्रेम भुरे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अल्पसंख्याक सर्फराज भाई शेख, पुणे जिल्हा शिक्षक आघाडी प्रशांत फड, हर्षद नढे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा आणि राज्यभरातून संघटनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाची सद्यपरिस्थिती नाजूक आहे. त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करण्याबरोबरच 10 हजार कोटी रुपयांचे आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे. तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांबाबतही तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. मराठा समाज अद्यापही शांत आणि संयमी भूमिकेत आहे. मात्र आमच्या संयमाचा कडेलोट होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात बोलताना जावळे पाटील म्हणाले की, “सध्या हवामानाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना त्यांनी मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कठोर कारवाईची मागणी केली.

“ज्ञानोबा-तुकोबारायांसारख्या संतांची भूमी असलेल्या या शहरात अशा गैरप्रकारांना थारा मिळणे लज्जास्पद आहे. प्रशासनाने तात्काळ यावर बंदी घालावी,” असे ते म्हणाले. तसेच, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचा निषेध करत त्यांनी या प्रकरणी कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली

.दरम्यान, अखिल भारतीय छावा संघटनेने यापूर्वीही मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी सर्व सामाजिक घटकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

“गेल्या 30 वर्षांपासून अखिल भारतीय छावा संघटना शेतकरी आणि सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आणि त्यांच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू,” असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले

Latest News