आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाले….

ps logo rgb

मुंबई : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारने मान्यता दिल्यानंतर, मनोज जरांगे-पाटील यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सरकारचे आभार मानले आणि सांगितले की, “आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालं आहे.” त्यांनी सर्व आंदोलकांना शांततेत आपापल्या गावी परतण्याचे आवाहनही यावेळी केले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आंदोलकांचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपले उपोषण सोडल्याची घोषणा करताच, उपस्थित आंदोलकांमध्ये जल्लोषाची लाट उसळली. राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. (मराठा आंदोलन)

मनोज जरांगे-पाटील यांच्या या घोषणेनंतर हजारो आंदोलकांनी “मनोज जरांगे पाटील जिंदाबाद”, “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अनेकांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी मिठाई वाटप करून यशाचे सेलिब्रेशन करण्यात आले


राज्य सरकारने मान्य केलेल्या प्रमुख मागण्या :

  1. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी त्वरित होणार.
  2. आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना नोकरी दिली जाणार.
  3. आंदोलनात सहभागी झालेल्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार.
  4. ५८ लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत दाखल केल्या जाणार.
  5. वंशावळ समिती गठित केली जाणार.
  6. सगेसोयऱ्यांची छाननी प्रक्रिया राबवली जाणार.
  7. मराठा = कुणबी असा शासन निर्णय (GR) दोन महिन्यांत जाहीर होणार.
  8. सातारा व औंध गॅझेट संदर्भातील निर्णय १५ दिवसांत लागू करण्यात येणार.

या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांसमोर दिली.