गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह – ऐतिहासिक व सामाजिक संदेशांचा संगम


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी-चिंचवड परिसरातील श्रीमती लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांना उत्साहात व आनंदात निरोप दिला.
या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे, महात्मा गांधी तसेच विविध संतश्रेष्ठ व महामानव यांची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी “झाडे लावा – झाडे जगवा”, “मतदान आपल्या हक्काचं ते करा”, “लोकशाही वाचवा”, “पाणी आडवा – पाणी जिरवा” असे जनजागृतीपर संदेश फलक घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
बँड-बाजा, ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर भक्तीत रंगून विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या प्रसंगी शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तात्या तापकीर व सचिव सागर तापकीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मिरवणुकीतून विद्यार्थ्यांनी भक्ती, संस्कृती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साकारला.