उपभोगवादाने मूलभूत समस्या दुर्लक्षित: प्रा. अरुणकुमार

ps logo rgb

‘पूंजीवाद के चरण और भारत में आज़ादी के बाद बढ़ती चुनौतियां’ विषयावर व्याख्यान
…………….
प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजन

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री, समाजवादी नेते आणि अर्थशास्त्रज्ञ प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फे शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील माजी प्राध्यापक प्रा. डॉ. अरुणकुमार यांनी ‘पूंजीवाद के चरण और भारत में आज़ादी के बाद बढ़ती चुनौतियां’ या विषयावर सखोल विवेचन केले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील आर्थिक विकासाचे विविध टप्पे, वाढता भांडवलशाही प्रभाव, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक विषमता तसेच रोजगार, उत्पादन आणि उपभोगाच्या क्षेत्रातील असंतुलन यांचा विस्तृत आढावा घेतला. डॉ. अरुणकुमार यांनी सांगितले की, आजच्या भारतात आर्थिक विषमता वाढत असून लोककल्याणावरुन लक्ष हटवले जात आहे, त्यामुळे समताधिष्ठित विकासाच्या दिशेने नवे विचार आणि चळवळ आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते साथी गजानन खातू उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रा. वर्दे यांच्या समाजवादी मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचा आणि त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, प्रा. वर्दे यांचा समाजवादी दृष्टिकोन आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी आणि आवश्यक आहे.व्यासपीठावर झेलम परांजपे, विनोद शिरसाठ, प्रा. सुभाष वारे, उपेंद्र टण्णू आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्र टण्णू यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. सुभाष वारे यांनी केले.राहुल भोसले यांनी आभार मानले. व्याख्यानाला समाजवादी कार्यकर्ते, अर्थशास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी या विचारप्रवर्तक व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अविनाश परांजपे, सुनील तांबे, मारुती भापकर,अनीस अहमद, डॉ.प्रवीण सप्तर्षी आदी उपस्थित होते.या व्याख्यानाद्वारे एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने समाजवादी विचारांचा आणि अर्थनीतीवरील संवादाचा वारसा पुढे नेण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली.

प्रा. अरुणकुमार म्हणाले,’ स्वातंत्र्यपूर्व काळातील शोषणाची अर्थव्यवस्था, स्वातंत्र्योत्तर काळातील सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था आणि नंतर उदारीकरणाची अर्थव्यवस्था या टप्प्यातून आपण गेलों आहोत. नफेखोरी, लालसा,विषमता वाढत आहे, बाजारकेंद्री दृष्टीकोण वाढत आहे.मूलभूत विषय बाजूला पडत आहेत.वैयक्तिक आयुष्यात असंतुष्ट असणारा व्यक्ती ग्राहक बनून अधिकाधिक खरेदीकडे वळत आहे. चालू स्थितीतील वस्तू फेकून नव्या आणण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यातून कर्ज, प्रदूषण आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम वाढले आहेत. काळा पैसा, विषमता वाढली आहे. असंघटित क्षेत्राकडे लक्ष दिले नाही. जीडीपी, विकास, अर्थव्यवस्थेचा आकार ४८ टक्क्याने फुगवून सांगीतला जात आहे. भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था नसून आपण सातव्या क्रमांकावर आहोत.संशोधन, कृषी मागे पडत आहे.त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.

मोफत वस्तू,पैसे देण्याने प्रगती होईल की रोजगार निर्मितीमध्ये गुंतवणूक केल्याने प्रगती होईल,हे सध्याचे सरकार लक्षात घेत नाही.ट्रंप काळात, टेरिफ युद्धात भांडवलशाहीचा चेहरा बदलत आहे. एआय सारख्या वेगवान तंत्रज्ञान बदलाने दीर्घ नियोजन करणे अवघड झाले आहे. विश्वासार्हता झपाटयाने कमी होत आहे.समस्या वाढत जाणार आहेत. व्यक्तीचे प्रश्न शासनाने न सोडवता ज्याचे त्याने सोडवावेत, अशी मांडणी पुढे येत आहे.सार्वजनिक संपत्ती कमी न करता वाढत गेली पाहिजे.चीन,अमेरिका, रशिया या त्रिकोणात आपण अडकलो आहोत.ही परिस्थिती बिकट होत असून देशाचे स्वत:चे धोरण पुढे आणणे आवश्यक आहे.

गजानन खातू म्हणाले,’ समाजात आणि सामाजिक चळवळीत अर्थसाक्षरता वाढली पाहिजे. प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी निमित्त हा महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.देशात नकारात्मकता वाढवली जात आहे. अर्थव्यवस्थेचे प्रारूप शोधावे लागणार आहे. समाजवादी विचारांना त्यात वाव असणार आहे,त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे’ .