राज्य सरकारकडून रमाबाई नगरमध्ये ‘माता रमाबाई आंबेडकरांचे’ स्मारक उभारणार


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
भारतरत्न, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य-दिव्य स्मारक मुंबईतील इंदू मिलमध्ये होत आहे. काही महिन्यात या स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. तर आता बाबासाहेबांच्या स्मारकासोबतच त्यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांचेसुद्धा स्मारक राज्य सरकारकडून उभारले जाणार आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरातील रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारले जाणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले, त्यावेळी शिंदे बोलत होते.
माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हा खासगी बिल्डर करत नाही, तर एमएमआरडीएच हा प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे रहिवाशांना दर्जेदार, चांगली घरे वेळेत मिळतील, याची मला खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच मी मुख्यमंत्री असताना भाडे वाटपाचे दीडशे कोटी रुपयांचे चेक दिले होते. त्यानंतर आपणाला घरे नक्की मिळतील, असा विश्वास रहिवाशांना बसला आणि एमएमआरडीए आणि एसआरए हा प्रकल्प वेळेत पूर्ण करतील, असा विश्वास आहे. लोकांना आणि मुंबईकरांना माहीत आहे की, काम कोण करतंय आणि घरी कोण बसतंय. मुंबईकरांना कामांना स्थगिती नव्हे तर प्रगती हवी आहे.
मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नव्हे तर विकासाचे वारकरी हवे आहेत आणि महायुतीचे हे सरकार म्हणजे निर्णय घेणारे आणि विकासाला चालना देणारे सरकार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच क्लस्टर योजनेमुळे सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, पुनर्विकासाचा हा फक्त ‘ट्रेलर’ आहे… ‘पिक्चर अभी बाकी है…’, असं शिंदे म्हणाले.
या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून माता रमाबाई नगरमधील लोक कठीण परिस्थितीत जीवन जगताहेत. पण आता ह्या लोकांचा कठीण काळ संपला आहे.
या ठिकाणी त्यांच्या स्वप्नाचे घर बांधले जाणार आहे, त्यामुळं पुढील तीन-चार वर्षांत 17 हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघणार आहे. त्यामुळं दिवाळी जरी पुढच्या आठवड्यात असली तरी या रहिवाशांची खरी दिवाळी आजच साजरी झाली आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सोसायटीच्या कमिटीच्या मागणीनुसार धम्मचक्र परिवर्तन दिनाचं औचित्य साधून भूमिपूजन होत असल्याने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे शिंदे म्हणाले. “आज का दिन है महान…, खुश रहे यहां का इंसान…, खत्म हो गई इंतजार की घडियां, अब मिलेगा आपके सपनों का मकान….” असं शायरी अंदाजातून एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.