डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

200360

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनात नवा अध्याय सुरू झाला असून राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत डॉ. विजय सूर्यवंशी यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सोमवारी (दि.१६) डॉ. सूर्यवंशी यांनी माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारत महापालिकेची धुरा आपल्या हाती घेतली.

महापालिका मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. या वेळी वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. श्रावण हर्डीकर यांनी डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. विजय सूर्यवंशी हे अनुभवी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. विविध प्रशासकीय पदांवर काम करताना त्यांनी विकासकामांना गती देण्यासोबतच नागरिकाभिमुख निर्णय घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या महानगरपालिकांपैकी एक असून शहरात पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. या सर्व प्रकल्पांना गती देण्याबरोबरच नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे नव्या आयुक्तांसमोरील मोठे आव्हान असणार आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

पिंपरी, दि. १६ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य संदीप कस्पटे,बाबासाहेब त्रिभुवन,नगरसदस्या आणि अधिकारी,कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले.

यावेळी महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात शहरातील विविध विकास प्रकल्प, नागरी सुविधा आणि महापालिकेच्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची गती कायम ठेवणे, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे तसेच प्रशासनाचे कामकाज अधिक प्रभावी आणि गतिमान करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

तसेच नवीन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत शहराच्या विकासासाठी प्रशासनाच्या माध्यमातून समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.