पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर ATS कारवाई

पुणे-पिंपरी चिंचवडसह 23 ठिकाणी एकाचवेळी छापे; अनेक संशयित ताब्यात, डिजिटल उपकरणांची तपासणी
पुणे- पिंपरी चिंचवड, दि. 14 जुलै (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या नेटवर्कविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मंगळवारी मोठी कारवाई केली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील 65 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली असून, त्यापैकी तब्बल 23 ठिकाणे पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.ATS च्या पथकांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण (खेड तालुका), भोसरी, दिघी आणि तळेगाव दाभाडे परिसरातील विविध ठिकाणांवर शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या डिजिटल उपकरणांचीही सखोल तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासात शहजाद भट्टी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या माध्यमांतून काही व्यक्तींशी संवाद साधून नेटवर्क विस्तारण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती ATS च्या तपासातून समोर येत आहे.
राज्यव्यापी मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन, संगणक, हार्ड डिस्क आणि इतर डिजिटल उपकरणांमधील माहितीचे विश्लेषण सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ATS कडून संबंधित संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणातील नेटवर्कची व्याप्ती, आर्थिक व्यवहार आणि परदेशी संपर्क याबाबत तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहे. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- मुख्य मुद्दे :
- महाराष्ट्रभर 65 ठिकाणी ATS ची धडक कारवाई
- पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील 23 ठिकाणांवर छापे
- अनेक संशयित चौकशीसाठी ताब्यात
- फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सॲपद्वारे संपर्काचा संशय
- डिजिटल उपकरणांची तपासणी सुरू
- शहजाद भट्टी नेटवर्कच्या धागेदोऱ्यांचा ATSकडून शोध सुरू.
