“ऑटो टॅक्सी” चालकांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक बैठक होईल” – मुरलीधर मोहोळ

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत बैठक.
भारत टॅक्सीचे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यात टू-व्हीलर टॅक्सीला आमचा कायम व प्रखर विरोध राहील,:- डॉ बाबा कांबळे,
भारत टॅक्सी मोबाईल अॅपमध्ये टू-व्हीलर टॅक्सी नको – ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालकांची ठाम मागणी
आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पुणे येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष आणि ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने भारत टॅक्सीमध्ये टू-व्हीलर टॅक्सीला असलेला विरोध दर्शविणारे निवेदन सादर केले तसेच नवी मुंबई येथे झालेल्या भारत टॅक्सी मोबाईल अॅपच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्रातील ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालक संघटनांना विश्वासात न घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, सचिव अविनाश वाडेकर व इतर सहपदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्ट आश्वासन
या बैठकीत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिष्टमंडळाला स्पष्ट आश्वासन दिले की,
“लवकरच पुणे येथे या संदर्भात सर्व संघटनांसोबत एक व्यापक बैठक बोलावू. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलावू आणि चर्चेतून ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालकांचे प्रश्न सोडवू.”ही माहिती डॉ. बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे, मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे संघटनांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत असले तरी, भारत टॅक्सी अॅपमध्ये टू-व्हीलर टॅक्सीबाबतची चिंता कायम आहे, असे डॉ बाबा कांबळे त्यांनी स्पष्ट केले.
भारत टॅक्सी उद्घाटन आणि संघटनांचा तीव्र विरोध
नवी मुंबई विमानतळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भारत टॅक्सी’चे उद्घाटन झाले. मात्र या महत्त्वाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ऑटो-टॅक्सी, रिक्षा आणि कॅब चालक-मालकांच्या कोणत्याही प्रमुख संघटनांना आमंत्रित करण्यात आले नाही किंवा त्यांना विश्वासात घेतले गेले नाही.
डॉ. बाबा कांबळे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “भारत टॅक्सी को-ऑपरेटिव्हच्या माध्यमातून सरकार ऑटो-टॅक्सी चालकांच्या हिताला डावलून चुकीचा अजेंडा राबवत आहे. यात ‘टू-व्हीलर टॅक्सी’ सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या दिल्ली येथिल अधिकारी महाराष्ट्र मनमानी करत आहेत व महाराष्ट्र सरकारला देखिल चुकीची माहिती पुरवीत आहेत या कारभाराचा आम्ही तीव्र विरोध करत राहू.”
एका बाजूला ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी ऑटो-टॅक्सी चालकांचे आर्थिक शोषण केले आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शोषणमुक्त आणि हक्काचे मोबाईल अॅप म्हणून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली . या घोषणेचे ऑटो-टॅक्सी चालकांनी स्वागत केले आहे. दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रातही ही सेवा सुरू झाली आहे. मात्र, ज्यांच्या भवितव्यासाठी आणि हितासाठी ही सेवा सुरू केली जात आहे, त्यांनाच या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक वगळले जात आहे, हे संतापजनक आहे.
डॉ. बाबा कांबळे यांनी ठामपणे सांगितले की, भारत टॅक्सीच्या माध्यमातून टू-व्हीलर टॅक्सी सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे राज्यातील ३० लाखांहून अधिक ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या रोजी-रोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. “भारत टॅक्सीचे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यात टू-व्हीलर टॅक्सीला आमचा कायम व प्रखर विरोध राहील,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. बाबा कांबळे
मोबाइल: ९८५०७३२४२४/9850732424,
नेते, ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत,
