महापालिकेत ठेकेदार, एजंट अन् सल्लागारांची ढवळाढवळ!

फाईली घेऊन जात असल्यामुळे गोपनियता धोक्यात
दीडशे कर्मचा-यांचे आयुक्तांना खळबळजनक निवेदन
पिंपरी: प्रतिनिधी
महापालिकेतील प्रशासकीय शिस्त आणि गोपनियता धोक्यात आणण्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेत बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य विभागात अनेक फाईली थेट ठेकेदार, एजंट, आर्किटेक्ट, सल्लागार हाताळत आहे. कामकाजात त्यांची ढवळाढवळ सुरु असल्याची तक्रार १५० हून अधिक कर्मचा-यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. हा हस्तक्षेप थांबविण्याचे विनवणी या कर्मचा-यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेत प्रशासकीय शिस्त व कामकाजासाठी नियमानुसार फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात किंवा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेण्याची जबाबदारी वर्ग ४ कर्मचारी (शिपाई) यांची असते. मात्र, अलिकडे महालिकेत अधिकारी, कर्मचा-यांव्यतिरिक्त बाहेरील ठेकेदार, एजंट, आर्किटेक्ट, सल्लागार किंवा त्यांचे खासगी कर्मचारी फायली घेऊन वावरतात. ते फाईली महापालिकेच्या बाहेर घेऊन जात असल्याचे दिसते. हा गंभीर प्रकार सुरु असतना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई किंवा दक्षता घेतली जात नाही. मात्र, १५० हून अधिक कर्मचा-यांच्या तक्रारीनंतर हा विषय चर्चेत आला आहे.
एखादी फाईल गहाळ किंवा हरवल्यास त्याचा थेट दोष वर्ग-४ कर्मचाऱ्यांवर ठेवला जातो. त्यांच्यावर नोटीस, दंड किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वरिष्ठ अधिकारीच स्वतः ठेकेदारांना फाईली ने-आण करण्यास सांगतात. तसेच, काही अधिकारी तर फाईली थेट पालिकेबाहेर देऊन, त्यावरील शासकीय टिपण्या किंवा दुरुस्त्या एजंटांकडूनच करून घेत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. फाईली ठेकेदार, बिल्डर, एजंट, आर्किटेक्टच्या हातात देण्यास मनाई करावी, फाईल गहाळ झाल्यास शिपाई कर्मचा-यांऐवजी थेट अधिका-यांना जबाबदार धरावे, अशी मागणी कर्मचा-यांनी आयुक्तांकडे केली आहे.
अधिकाऱ्यांच्या केबिनवर एजंटांचा ‘मुक्त वावर’
महापालिकेचे अधिकारी केबिनमध्ये असोत वा नसोत, ठेकेदार आणि एजंट दिवसभर अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या अवतीभवती ठाण मांडून बसलेले असतात. सुरक्षारक्षकांना हे माहीत असूनही ते हतबल आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांच्या निवेदनानंतर महापालिकेला कारभार चर्चेत आला असून या आरोपांची दखल घेत आयुक्त काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.
स्थापत्य विभागातील ‘त्या’ फाईलचा प्रताप
कर्मचाऱ्यांनी या निवेदनात एक उदाहरण दिले आहे. स्थापत्य विभागातील एक फाईल एका ठेकेदाराने स्वतःच्या ताब्यात घेऊन ती थेट पाणीपुरवठा विभागात नेऊन ठेवली. मात्र, आश्चर्य म्हणजे या संपूर्ण प्रकारात फाईल गायब झाल्याची टांगती तलवार आणि जबाबदारी मात्र वर्ग-४ कर्मचाऱ्यावर टाकण्यात आली. या अशा प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
—–फोटो
