ससून रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात शनिवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास एका रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय कक्षातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णाला तातडीने उपचार देण्यास (सीपीआर) सुरुवात केली. त्या वेळी रुग्णाचा नातेवाईक असलेल्या आरोपीने मोबाइलवरुन चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी त्याला चित्रीकरणास मनाई केली. तेव्हा आरोपीने वैद्यकीय कक्षात गोंधळ घातला.
डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला रोखले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती आणि वैद्यक सेवा संस्था (हिंसक कृत्य, मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.
ससून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर तातडीचे उपचार करताना रुग्णाच्या नातेवाईकास मोबाइलवरुन चित्रीकरणास मनाई केल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रुग्णाच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय आरोपी घोरपडी गावात राहायला आहे.
