पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीत रॅम्पऐवजी पायऱ्या करण्याची अरुण पवार यांची मागणी

arun

अरुण पवार यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपळे गुरव प्रभाग क्र. २९ मधील स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ खांदे बदलीच्या ठिकाणी रॅम्प व पायऱ्यांच्या चुकीच्या रचनेमुळे पावसाळ्यात व इतर वेळीही पाय घसरून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने येथील रॅम्प काढून टाकून पायऱ्या करणे व पायऱ्या आहेत त्या ठिकाणी अंत्यविधीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स किंवा टेम्पो अशा वाहनांसाठी जागा करणे गरजेचे आहे, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (महाराष्ट्र शासन) वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेचे स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले.
या संदर्भात अरुण पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेने पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीचे नूतनीकरण केले. मात्र, यामुळे स्मशानभूमीतील समस्या सुटण्याऐवजी नागरिकांना त्रासच सहन करावा लागत आहे. यामध्ये स्मशानभूमीच्या मुख्य रस्त्याकडील मुख्य प्रवेशद्वाराची रुंदी साधारण २५ फूट आहे. परंतु, अंत्यविधीच्या वेळी अंत्ययात्रा आल्यानंतर वाटेत खांदे बदली करण्यासाठी लोक तिथे थांबतात. तेथील वटा तेथील थांबा व्यवस्थित केलेला आहे पण ज्या ठिकाणी थांबा आहे त्या ठिकाणाहून मयत अंत्यविधी चार खांदेकर यांनी उचलून खांद्यावर घेतल्यानंतर त्या ठिकाणी रॅम्प असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते नागरिकांना अंत्यविधीची मयत सुरक्षितपणे अंत्यविधी ठिकाणापर्यंत रॅम वरून पाय घसरत असल्यामुळे कठीण जाते. त्यामुळे स्मशानभूमीजवळ अंत्ययात्रा आल्यानंतर खांदे बदली करण्यासाठी जिथे थांबा आहे, त्या बाजूला तात्काळ रुंद पायऱ्या किंवा टप्पे करण्याची आवश्यकता आहे.
तसेच, सध्या ज्या बाजूला अत्यंत छोट्या व अरुंद पायऱ्या आहेत, त्या बाजूला सुधारणा करून तेथून ॲम्बुलन्स गाडी किंवा टेम्पो येण्या-जाण्यासाठी जागा करण्यात यावी, जेणेकरून अंत्यविधीचे साहित्य किंवा इतर वस्तू घेऊन येणारे वाहन सहजपणे आत येऊ शकेल.
अरुण पवार यांनी पुढे म्हटले आहे, की स्मशानभूमीत अंत्यविधीच्या वेळी साधारण एक ते दीड हजार नागरिकांची उपस्थिती असते. खांदे बदलीच्या ठिकाणचे रॅम्प काढून टाकून त्या ऐवजी टप्प्याटप्याने पायऱ्या केल्यास पाय घसरून पडण्याच्या घटना घडणार नाहीत.
———————-
पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीतील या गंभीर समस्येबाबत गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने या जनहिताच्या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाने तात्काळ जागेची पाहणी करावी.

– अरुण पवार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (महाराष्ट्र शासन) वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार विजेते

Latest News