सत्ताधारी भाजपने नगरसेवकांचा निधी काढून घेतल्याच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने महापालिकेत आंदाेलन केले.

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) राज्यात महायुतीत सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांमध्ये महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपने नगरसेवकांचा निधी काढून घेतल्याच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने महापालिकेत आंदाेलन केले. सत्ताधारी हुकुमशाही करीत असल्याचा आराेप यावेळी केला आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करताना स्पष्ट भूमिका मांडली. नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या प्रभागातील विकास निधी हा त्या नगरसेवकाचा वैयक्तिक निधी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठीचा निधी आहे. राजकीय मतभेद असतील तर ते राजकीय पातळीवर सोडवावेत. मात्र एखाद्या नगरसेवकाने प्रश्न उपस्थित केला किंवा एखाद्या प्रस्तावाला अनुमोदन दिले म्हणून त्याच्या प्रभागातील विकासकामांचा निधी रोखणे अथवा दुसरीकडे वळवणे म्हणजे थेट त्या प्रभागातील नागरिकांवर अन्याय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य अथवा दुसऱ्या प्रभागात वर्ग करण्याच्या निर्णयाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम, अध्यक्ष सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे पाटील, दीपक मानकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या इमारतीत हे आंदाेलन पार पडले. त्यानंतर सर्व नगरसेवकांच्या वतीने महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांना निवेदन देत निधी पुर्ववत करण्याची मागणी केली. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मंजूर करण्यात आलेला १.५ कोटींचा निधी शून्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शांती नगर येथील बुद्ध विहाराचा निधीही शून्य करण्यात आला. अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघातील विकासकामांबाबत चौकशीची मागणी करणाऱ्या प्रस्तावाला सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिल्यानंतर त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करण्याची कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
