ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृती, आंदोलने आणि बैठका झाल्यानंतरही आवाजाची पातळी कमी होण्याऐवजी वाढली….

dj

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -विसर्जन मिरवणुकीपूर्वीच डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटामुळे मध्यवर्ती भाग अक्षरशः दणाणून गेला. सीओईपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे विभागप्रमुख महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समन्वयक मेहेर आणि आयुष यांनी

विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध वेळांमध्ये ध्वनीपातळीची नोंद केली. बेलबाग, गणपती, लिंबराज, कुंटे, उंब्या, गोखले, शेडगे, होळकर, टिळक आणि खंडोजीबाबा या चौकांमध्ये मोजमाप करण्यात आले. यंदा दुपारी चार ते मध्यरात्री बारा दरम्यान ध्वनीची तीव्रता विशेष वाढली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल, तर निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल मर्यादा आहे. सीओईपीच्या नोंदीतील १०४.५ डेसिबलची सरासरी पातळी या मर्यादांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अधिक आहे. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन प्रत्यक्ष मिरवणुकीत कितपत प्रभावी ठरले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.चौकाचौकांत ध्वनीपातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा असण्याची अपेक्षा असतानाही अनेक ठिकाणी डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसले. त्यातच रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह मिरवणुकीच्या नियोजनावरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यासह मध्यवर्ती भागात यंदा ध्वनिप्रदूषणाने पुन्हा गंभीर पातळी गाठल्याचे ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख दहा चौकांमध्ये मिरवणुकीदरम्यान सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनीपातळीची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या ९२.६ डेसिबलच्या तुलनेत यंदा त्यात तब्बल १२ डेसिबलने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ध्वनिप्रदूषणाविरोधात यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती, आंदोलने आणि बैठका झाल्यानंतरही आवाजाची पातळी कमी होण्याऐवजी वाढली आहे.सर्व चौकांची सरासरी ध्वनीपातळी दुपारी चार वाजता ११३.४, रात्री आठ वाजता १११.९ डेसिबल, तर मध्यरात्री बारा वाजता ११२.६ डेसिबल नोंदली गेली. उंबऱ्या चौकात दुपारी चार वाजता ११५.२ डेसिबल, तर गोखले चौकात रात्री आठ वाजता ११५.४ डेसिबल इतकी पातळी नोंदली गेली.

Latest News