प्रतिभा महाविद्यालयाच्या ‘सायबर योद्ध्यां’कडून १५ दिवस सायबर जनजागृती मोहीम

चिंचवड :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) वाढत्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक, आर्थिक लूट आणि वैयक्तिक माहितीच्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील प्रशिक्षित ‘सायबर योद्धा’ विद्यार्थ्यांनी सलग १५ दिवस विविध ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती केली.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी तसेच क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, संचालक अजय शिर्के, दीपु सिंग आणि गायत्री केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दामोदर चापेकर परिसर, काळभोरनगर, रूपीनगर तसेच मावळ परिसरातील सातेगाव येथे विद्यार्थ्यांनी नागरिक, भाजीविक्रेते, विद्यार्थी, तृतीयपंथीय समुदाय आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांशी संवाद साधला. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, बसस्थानके आणि गर्दीच्या भागांमध्येही नागरिकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सातेगाव येथे सरपंच ज्योती आगालमे आणि उपसरपंच वैशाली आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाच्या सायबर सेलच्या अध्यक्षा स्नेहा तेली तसेच सिमरन यादव, पियुषा रोहम, साकिब चौधरी, प्रज्ञा गावडे आणि फैसल खान या सायबर योद्ध्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले, मोबाईलमधील सुरक्षाविषयक बाबी तपासल्या आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी सायबरमुक्त प्रमाणपत्रांचेही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नागरिकांना दिला सायबर सुरक्षिततेचा संदेश
या मोहिमेदरम्यान नागरिकांना अनोळखी लिंक आणि संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात आले. बँकेचा ओटीपी, पासवर्ड आणि आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये, मजबूत पासवर्ड वापरावा तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो आणि लोकेशन अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक
प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गातील शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत डिजिटल साक्षरतेचा संदेश घरोघरी पोहोचविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमातून सुरक्षित, सतर्क आणि सक्षम डिजिटल समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
