232 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज…

ps logo rgb

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके मतदान साहित्य ताब्यात घेऊन संबंधित केंद्रांकडे रवाना झाली आहेत.

पुणे जिल्ह्यातील २३२ मतदान केंद्रांवर शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रनिहाय नियोजन, कर्मचारी नियुक्ती, वाहतूक आणि मतदान साहित्याच्या वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पदवीधरांसाठी १६०, शिक्षकांसाठी ७२ मतदान केंद्रे

जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी १६०, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि मतदान साहित्य संबंधित पथकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एकूण १ लाख ५ हजार ८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ८८ हजार २०२, तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ हजार ८८२ मतदारांची नोंदणी झाली आहे. अशा प्रकारे दोन्ही मतदारसंघांत मिळून १ लाख ५ हजार ८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवरील व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

मतदान साहित्य आणि स्ट्राँगरूमसाठी स्वतंत्र व्यवस्था

मतदान साहित्याचे वितरण, मतदानानंतर साहित्य स्वीकारणे आणि स्ट्राँगरूमची व्यवस्था यासाठी पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये स्वतंत्र केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

  • पुणे शहर: श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट
  • पुरंदर: नवीन प्रशासकीय इमारत, पारगाव रोड
  • हवेली: सिंहगड कॉलेज, आंबेगाव
  • मावळ-मुळशी: संबंधित तहसील कार्यालये
  • भोर-वेल्हा: तहसील कार्यालय, भोर येथील पुरवठा शाखा
  • दौंड, जुन्नर आणि खेड: संबंधित तहसील कार्यालये
  • बारामती-इंदापूर: अभियांत्रिकी भवन, बारामती

मतदानानंतर साहित्य सुरक्षितपणे स्वीकारून निर्धारित ठिकाणी जमा करण्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

२७ ऑक्टोबरला मतमोजणी

भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानुसार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारांनी निर्धारित वेळेत आपल्या संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

Latest News