महापालिका मुख्यालय , पोलिस आयुक्तालय,खासगी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करा :मछिंद्र तापकीर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय विभागातील डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. महापालिका मुख्यालय , पोलिस आयुक्तालयसह इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते . त्यामुळे महापालिका मुख्यालय , प्रभाग कार्यालय , पोलिस आयुक्तालय आणि खासगी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करावे अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मछिंद्र तापकीर यांनी केली आहे .
याबाबत तापकीर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये आजअखेर पर्यंत 22 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यापैकी 12 रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये 10 रुग्णांवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत.
राज्यात तसेच पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.शहरातील कोरोना रुग्णांवर यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्ग यांना संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे.
त्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण स्मृतीरुग्णालय,महापालिका मुख्यालय,प्रभाग कार्यालय , आरोग्य कोठी , पोलिस ठाणे – चौक्याचे आणि खासगी रुग्णालयांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करावे. थर्मल स्कँनरची सोय करावी , अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मछिंद्र तापकीर यांनी केली आहे .