आंतरजिल्हा प्रवासा साठी ई-पास ची सुविधा
अति महत्वाच्या कारणासाठी आंतरजिल्हा प्रवासाकरिता पोलिसांकडून ई-पासची सोय . या पासकरिता करावा लागणार ऑनलाइन अर्ज
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. सदर काळात वैद्यकीय अथवा मृत्यू अथवा इतर अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून महाराष्ट्रातील इतर जिल्हयात जाण्यासाठी ई-पास उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याकरीता नागरिकांनी आंतरजिल्हा प्रवासासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस येथे स्वतः रजिस्टर होणे गरजेचे आहे. आवश्यक ते कागदपत्र व फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरताना अत्यावश्यक सेवा कारण/उद्देश येथे आपला आंतरजिल्हा प्रवास करण्याचा उद्देश स्पष्ट लिहिणे गरजेचे आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवास प्रारंभ ठिकाण व प्रवासाचे अंतिम ठिकाणही लिहीणे अत्यावश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधितांना टोकन दिले जाईल. हे टोकन जपुन ठेवल्यास आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यास मदत होणार आहे.पोलीसांकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच ई-पास दिला जाईल किंवा नाकारण्यात येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास वेबसाईटवरूनच आपला ई-पास डाऊनलोड करावा. ई-पास मिळाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधितांनी प्रवासात जवळ ठेवावी. पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी मागितल्यानंतर ती प्रत दाखवावी. सदरचे ई-पास हे फक्त आंतरजिल्हा प्रवासासाठीच ऑनलाईन मिळतील. पिंपरी चिंचवड व पुणे येथे जाण्या-येण्यासाठी लागणारे अत्यावश्यक अंर्तगत पास हे वरील वेबसाईटवर अर्ज करून दिले जाणार नाहीत. सदरची वेबसाईटचा वापर फक्त आंतरजिल्हा ई – पास मिळणेसाठीच आहे.