“2 कोटी” रुपयांची आयटीसी प्रा.लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

मुंबई – आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची तसेच गरजु लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटसमयी आतापर्यंत अनेकांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये जमा झाले आहेत. समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करणाऱ्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकटकाळात लहान बालकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे. कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहे, कुणी वस्तु रुपाने तर कुणी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करत आहे. समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून केलेल्या या मदतीला कृतज्ञतेचे कोंदण आहे म्हणून त्यांचे हे दातृत्व विलक्षण शोभून दिसत आहे. दरम्यान, या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि लाखमोलाच्या साथीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सर्व जनतेचे आभार मानले आहेत. तर नागरिकांनी देखील आपला खारीचा वाटा म्हणून राज्याला या संकटसमयी आर्थिक आधार दिला आहे.

Latest News