प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन

मुंबई – अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. वॉन्टेड, दबंग, एक था टायगर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले आहे. ते अवघ्या ४२ वर्षांचे होते.वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेंबूर येथील सुराना रुग्णालयात उपचार सुरु होते. तर मागील ४ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे दोन पुत्र साजिद-वाजिद यांनी अल्पकाळात मनोरंजन विश्वात नाव कमावले. त्यांनी १९९८ मध्ये सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’मधून सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंगसारख्या चित्रपटांतील गाण्यांची रचना केली होती. वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. लॉकडाऊन काळात त्यांनी सलमानचे प्यार करोना आणि भाई भाई हे गाणेही कंपोझ केले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

Latest News