”इंडिया का भारत” आज निकाल सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द वगळावा आणि ‘भारत’ या नावानेच देशाची ओळख व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तमाम देशवासियांचे डोळे सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहेतघटनेतील कलम 1 मध्ये सुधारणा करुन ‘इंडिया’ हा शब्द वगळावा अशी दिल्लीच्या याचिकाकर्त्याची मागणी आहे. संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये सुधारणा करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे. यामध्ये बदल करुन ‘इंडिया’ऐवजी भारत नाव वापरण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. ब्रिटीशांनी भारताला ‘इंडिया’ असे संबोधले. त्यांच्या आधी भारतातील सर्वात मोठे साम्राज्य असलेल्या मुघलांनी देशाला हिंदुस्थान म्हटले होते. मोठ्या चर्चेनंतर ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही दोन्ही नवे संविधानात समाविष्ट करण्याबाबत त्यावेळी सहमती झाली होती. ‘इंडिया’ हे ‘गुलामगिरीचे प्रतिक’ आहे. त्यामुळे ‘भारत’ हे देशाचे एकमेव नाव म्हणून ओळख व्हावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. ज्या ठिकाणांची नावे आतापर्यंत बदलली गेली, त्यांचा उल्लेखही याचिकाकर्त्यानी केला आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र सरन्यायाधीश शरद बोबडे अनुपस्थित असल्याने सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आलं. त्यानंतर आज सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.