मनोज तिवारी यांची पदावरून उचलबांगडी

दिल्ली – दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आदेश गुप्ता यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी ही जबाबदारी गुप्ता यांना दिली आहे. केवळ दिल्लीतच नव्हे तर छत्तीसगड आणि मणिपूरमध्येही प्रदेशाध्यक्षांमध्ये बदल करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी विष्णुदेव साय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर मणिपूरची जबाबदारी टिकेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. या बदलांमुळे भाजपच्या राजकारणाला वेळ वळण लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजपने दिल्लीची विधानसभा निवडणूक खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. मात्र राजधानी दिल्लीत भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मनोज तिवारी यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र त्यावेळी नड्डा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.

Latest News