उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी राहुल गांधींची बातचीत अनेक मुद्देवर चर्चा

नवी दिल्ली : आपण कठीण लॉकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये अनेक चुका होत्या. यामुळं आपल्याला दोन्ही बाजूंनी नुकसानच झालं. आता आपण या व्हायरसच्या संकटापासून सावरु शकलो नाहीत, मात्र यासोबत अर्थव्यवस्था मात्र कोलमडून पडली आहे, असं उद्योगपती राजीव बजाज यांनी म्हटलं आहे. मला वाटतं लोकांच्या डोक्यातून भीती काढण्याची आधी गरज आहे. यासाठी विचार स्पष्ट असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजीव बजाज यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बजाज म्हणाले की, खूप लोकं महत्वाच्या गोष्टी बोलायला घाबरत आहेत. अशा काळात आपल्याला सहिष्णू आणि संवेदनशील राहून भारतात काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारकडून घोषित आर्थिक पॅकेजवर बजाज म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये सरकारने जे लोकांसाठी दिलं त्यातील दोन तृतीअंश लोकांपर्यंत ते पोहोचलं. भारतात मात्र  10 टक्के लोकांच्या हातातच मदत गेली आहे. ते म्हणाले की आपल्याकडे सत्य सांगण्यात कमी पडलो आहोत. लोकांना कोरोना हा कॅंन्सरसारखा वाटू लागलाय. लोकांचे विचार बदलून त्यांचं जीवनमान पुन्हा रुळावर आणण्याची गरज आहे. यासाठी वेळ लागेल, असंही ते म्हणाले. सामान्य माणसाच्या दृष्टीने लॉकडाऊन खूप कठीण आहे. भारतासारखा लॉकडाऊन दुसरीकडे कुठेच नाही. आपण जपान आणि स्वीडनसारखं धोरण राबवायला हवं होतं, तिथं नियमांचं पालन होत आहे मात्र लोकांना त्रास मात्र होत नाही, असं देखील बजाज यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल बजाज यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

WhatsApp chat