पुण्याचा मृत्यूदर रोखण्यास पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यश

पुणे : पुण्याचा मृत्यूदर रोखण्यास पालिका आणि जिल्हा प्रशासनाला थोडफार यश आल्याचं चित्र आहे. गेल्या 6 दिवसात पुण्याचा मृत्यूदर 0.21 टक्क्यांनी घसरला आहे. 2 जूनला 5.06 टक्के असलेला मृत्यूदर हा 8 तारखेला 4. 85 टक्के झाला. म्हणजेच 6 दिवसात पुण्याचा मृत्यूदर 0.21 टक्‍क्‍यांनी घटला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत पुण्याचा मृत्यूदर हा राज्य आणि देशाच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर 4.85% तर महाराष्ट्राचा 3. 58% आणि देशाचा मृत्यूदर 2. 81 टक्के आहे.

देशात सध्या कोरोनाचे 2 लाख 65 हजार 776 रुग्ण आहेत. यापैकी 1 लाख 28 हजार 919 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 29 हजार 369 रुग्ण उपचार घेत असून 7 हजार 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, राज्यात सध्या एकूण कोरोना 88 हजार 528 रुग्ण आहेत. यापैकी 40 हजार 975 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 44 हजार 384 रुग्ण उपचार घेत असून 3169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 062 इतकी झाली आहे. यापैकी 5 हजार 185 रुग्ण बरे झाले असून 2 हजार 486 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 391 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण वाढले तरी मृत्यू रोखा, केंद्रीय पथकाचा पुणे मनपाला सल्ला, ‘नो मोअर लाईफ लॉस’चा नारा

आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला ‘नो मोअर लाईफ लॉस’ हा खबरदारीचा नवा मंत्रा दिला होता. ‘पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी यापुढे एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू होणार नाही याची महापालिका प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ‘नो मोअर लाईफ लॉस’ हा पुण्यासाठीचा नवा नारा असेल’, असा सल्ला आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला दिला होता.

Latest News