सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे : महापौर ढोरे क्रेडाई पुणे मेट्रो संस्थेच्या वतीने जिजामाता रुग्णालयास अत्यावश्यक साहित्याचे हस्तांतरण

सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे : महापौर ढोरे
क्रेडाई पुणे मेट्रो संस्थेच्या वतीने जिजामाता रुग्णालयास अत्यावश्यक साहित्याचे हस्तांतरण
पिंपरी (15 जून 2020) : कोरोना या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. प्रशासनाबरोबरच शहरातील सामाजिक संस्थांनीदेखील नागरिकांना उपयोगी होईल अशी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी केले.
क्रेडाई पुणे मेट्रो या संस्थेच्या वतीने पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात सीएसआर फंड अंतर्गत आयसीयू वॉर्डसाठी आवश्यक असणारे 12 बेड, व्हेंटीलेटर व इतर अत्यावश्यक साहित्य देण्यात आले. त्याचा हस्तांतरण समारंभ सोमवारी (दि. 15) जिजामाता रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, उपाध्यक्ष अनिल फरांदे, खजिनदार आय.पी. इनामदार, सदस्य विनोद चांदवानी, संतोष कर्नावट, सतीश अगरवाल, डायरेक्टर जनरल डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाईचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ज्येष्ठ नगरसेवक डब्बू आसवानी, संदीप वाघेरे, उषा वाघेरे, निकिता कदम, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्मिता झगडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी, संगणक विभाग प्रमुख निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, लिंकरोड या भागातील रहिवाशांना जिजामाता रुग्णालयासारख्या अद्ययावत रुग्णालयाची गरज होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता रुग्णालयाचे काम प्रशासनाने युद्ध पातळीवर पूर्ण करून अल्पावधीतच आयसीयू वॉर्डचीदेखील उभारणी पूर्ण केली आहे. यामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होऊन इतर भागातील नागरिकांना या सेवासुविधेचा लाभ होईल.
क्रेडाईचे सुहास मर्चंट यांनी सांगितले की, क्रेडाई पुणे मेट्रोच्या माध्यमातून मागील अडीच महिन्यात पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए विभागात, पोलिस विभाग, ससून हॉस्पिटल, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय विभागातील आवश्यक साहित्य खरेदीसाठी आणि गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यासाठी 15 कोटी रुपये सीएसआर फंडांतर्गत देण्यात आले आहेत. पिंपरीमधील जिजामाता रुग्णालयातील आयसीयू वॉर्डच्या उभारणीसाठी क़्रेडाईने मदत करावी असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते. त्यामुळे उपाध्यक्ष अनिल फरांदे, संतोष कर्नावट, डॉ. दिवाकर अभ्यंकर यांनी अल्पावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आजचा हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, राज्यात कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर नंबर एक वर होते. शहरात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे प्रशासन अत्यावश्यक सेवासुविधा उभारण्यासाठी युद्ध पातळीवर काम करीत होते. त्याचेच फलित म्हणून भोसरीत नवीन 100 बेडचे व पिंपरीतील 120 बेडचे जिजामाता रुग्णालय पूर्ण करण्यात आले. जिजामाता रुग्णालयात आयसीयू वॉर्डसाठी आवश्यक असणारे साहित्य देण्यासाठी क्रेडाई मेट्रो पुणे संस्थेने मदत केली. याबद्दल शहरातील नागरिक व प्रशासनाच्या वतीने आयुक्त हर्डीकर यांनी आभार व्यक्त केले

Latest News