अभिनेता सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता का याची चौकशी होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

sushant-singh-rajput-7592

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला नैराश्याने ग्रासले होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी रविवारी वर्तवला होता. तसेच व्यावसायिक स्पर्धेमुळे आलेल्या डिप्रेशनमुळेच सुशांतने असे टोकाचे पाऊल उचलले, असे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दाखवले. याची दखल घेऊन ‘खरंच व्यावसायिक स्पर्धेमुळे सुशांत क्लिनिकल डिप्रेशनमध्ये गेला होता का? याचीही चौकशी केली जाईल’, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट केलं आहे की, ‘शवविच्छेदन अहवालात सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र काही प्रसारमाध्यमांनी व्यावसायिक स्पर्धेमुळे डिप्रेशनमध्ये जावून त्याने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस त्यादृष्टीनेदेखील चौकशी करतील.’

दरम्यान, रविवारी रात्री सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली. तसेच जेजे रुग्णालयात करण्यात आलेल्या उत्तरीय तपासणीत त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष नसल्याचे स्पष्ट झाले. सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Latest News