पुणे: साईड दिली नाही म्हणून तरुणाला मारहाण करणारे २ पोलीस निलंबित

मावळ :चारचाकी वाहनाला साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीवरून जाणार्या तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जयराज देवकर व माणिक अहिनवे अशी या निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत. दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई पुणे महामार्गावर खासगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलिसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले.
मात्र, दुचाकीस्वारांकडून पुढे वाहन थांबले असल्याने साईट देता आली नाही. या कारणावरून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रफुल बोराडे तसंच त्याचा मित्र सुमित जरांडे या दोघांना बेदम मारहाण केली. मारहाणीत प्रफुल्ला गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण घटनेची मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी गंभीर दखल घेतली असून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
संपूर्ण घटनेची शहानिशा करून अवघ्या चार तासातच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे निलंबन केले आहे.