तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध सीबीआय सुप्रीम कोर्टात


कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्यातील चौकशीवरून हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सुटका केली. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करीत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. त्यामुळे रविवारपासून कोलकाता पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
सीबीआयचे एक पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायला गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पोलीस आयुक्तांच्या घरी पोहोचल्या होत्या. पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी भेटी दरम्यान झालेल्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्ही कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांकडे विना वॉरंटचं जाता. तुमची इतकी हिंमत कशी झाली? असा सवालही ममतांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, आता या वादात इतर नेत्यांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनात उतरले आहेत, तर अरविंद केजरीवाल हे आज सोमवारी ममताजींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.