पुणे महापालिकेच्या कारभाराबद्दल धक्कादायक माहिती उघड…

पुणे : पुणे महापालिका कोरोनाच्या काळात किती वेगवान आणि अचूक काम करते याची लक्तरे वेशीवर टाकणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल दीड महिन्यापासून पुणे क्रेडाईने दिलेले 10 व्हेटिलेटर्स हे वापरा अभावी पडून आहेत. तर दुसरीकडे बेड किंवा व्हेंटिलेटर मिळत नाहीत म्हणून रूग्णाचे हाल होत असल्याच्या तक्रारी रोज येत आहेत.

पुण्यातला महापालिकेची ही दळवी हॉस्पिटलची इमारत. कोरोनाच्या काळात सगळ्या आरोग्य यंत्रणा ताकदवान करण्याचा प्रयत्न होत असताना अनेक सामाजिक संघटनांनी त्याला हातभार लावला आहे. पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिकाची संघटना असलेल्या क्रेडाईने पुणे महापालिकेला दीड महिन्यापूर्वी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले ते दळवी रूग्णालयात बसवण्यात ही आले. मात्र, केवळ तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याच्या सबबीखाली हे 10 व्हेंटिलेटर वापराअभावी पडून आहेत. एकीकडे अत्यवस्थ रूग्णांना बेड आणि व्हेंटिलेटर मिळत नसताना उपलब्ध यंत्रणा वापराविना पडून राहत असेल तर याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हा गलथानपणा महापौरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. याबाबतची जाहिरात वर्तमान पत्रात देऊन दोन दिवसात तंत्रज्ञांची भरती करून हे व्हेंटिलेटर तात्काळ सुरू करू असं आश्वासन ही महापौर मुरलीधर मोहोळ  यांनी दिले आहे.

संकटाच्या काळात प्रचंड कार्यक्षमतेने काम करण्याची गरज असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दाखवली जाणारी लालफितीची दिरंगाई ही जीव जाणाऱ्या महामारीच्या काळात परवडणारी नाही. त्यामुळे तातडीने ही जीवघेणी दिरंगाई थांबवली पाहिजे.

Latest News