बिल्डरधार्जिण्या अधिका-यांची चौकशी करावी…..विशाल वाकडकर


बिल्डरधार्जिण्या अधिका-यांची चौकशी करावी…..विशाल वाकडकर
वाकडमधील रानजाई गार्डन जवळील रस्ता बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी पिंपरी (दि. 6 फेब्रुवारी 2019) वाकड परिसरातील रानजाई गार्डन नजिकचा अंतर्गत अठरा फूट रस्ता बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी बनविण्यात आला आहे. हा रस्ता बनविणा-या बिल्डरधार्जिण्या अधिका-यांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देऊन केली आहे. वाकड परिसरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत आहे. त्यासाठी अंतर्गत रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, आवश्यक तेथे नविन रस्ते व उड्डाणपूल उभारले जावेत अशी मागणी नागरिक वर्षांनुवर्ष करीत आहेत. वाकडमध्ये दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष वाढत आहे. पीएमपीच्या सार्वजनिक वाहतूकीचा देखील बोजवारा उडाला आहे. अंतर्गत जलवाहिण्या, पावसाळी गटारे, पदपथ, पथदिवे उभारणे आवश्यक आहे. त्याकडे महापालिका प्रशासन, अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. रानजाई गार्डन परिसरातील सर्व्हे नं. 153 व 156 मध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक टोलेजंग इमारती उभारत आहेत त्या बांधकाम व्यावसायिकांची मर्जी राखण्यासाठी महापालिका अधिका-यांनी आता गरज नसतानाही अठरा फुटी रस्ता बांधला आहे. नागरिकांना लक्ष्मीदिप सोसायटीच्या दक्षिण बाजूचा रस्ता गरजेचा असताना बिल्डरांनी अधिका-यांना हाताशी धरुन उत्तर बाजूचा रस्ता केला आहे. या प्रकरणाची आयुक्त हर्डीकर यांनी चौकशी करावी व संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी वाकडकर यांनी या पत्रात केली आहे.