राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री फडणवीस?


बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना डावलून जयदत्त क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घणाघाती भाषण करीत धनंजय मुंडे यांच्यावरच टीका केली.
या कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस संपूर्ण बीड शहरात क्षीरसागर यांनी मोठमोठे पोस्टर लावले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर व त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचेच फोटो होते.
तसेच भाजपाच्या सर्व आमदारांची नावे होती. आज मुख्यमंत्र्यांच्या बीड जिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध विकासकामांसाठी 250 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला.
बीड नगरपरिषदेच्या वतीने आज अटल अमृत पेयजल योजना, भुयारी गटार योजना, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि नगरपालिकेच्या सभागृहाला ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्याप्रमाणे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बोचरी टीका केली.