इम्तियाज जलील हे सातत्याने परिस्थिती बिघडवतात – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (2 सप्टेंबर) औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यापूर्वी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ‘निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन हा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आरोप चुकीचा आहे. असं असेल तर पुढचे चार वर्ष निवडणूकच घेऊ नका,’ अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली. तर दुसरीकडे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘जलील यांच्यावर कडक कारवाई करा,’ अशी मागणी केली आहे. ‘मशिदीत नमाज अदा करणाऱ्या जनभावनेची सरकारला जाणीव करुन देण्यासाठी हे आंदोलन होतं. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरुपात काही लोकांना मशिदीत घेऊन जाणार होतो. लोकांनी संयम ठेवावा. निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन हा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आरोप चुकीचा आहे. असं असेल तर पुढचे चार वर्ष निवडणूकच घेऊ नका,’ असे इम्तियाज जलील म्हणाले.

इम्तियाज जलील यांच्यावर कडक कारवाई करा

तर दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. ‘इम्तियाज जलील हे सातत्याने परिस्थिती बिघडवत आहेत. पोलिसांनी इम्तियाज जलील यांची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत जेवढ्या वेळा परिस्थिती बिघडवली त्याची माहिती काढण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा,’ असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

जलील मशिदीत नमाज अदा करण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (2 सप्टेंबर) औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली होती. इम्तियाज जलील काही कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील शहागंज मशिदीत जाऊन नमाज अदा करणार होते. त्यांनी कार्यालयापासून चालत आंदोलनाला सुरुवात केली. मात्र वाटेतच औरंगाबाद पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर जलील यांना पोलिसांच्या गाडीत बसवून ताब्यात घेण्यात आले.

इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.तसेच मशिदकडे येणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.

तसेच इम्तियाज जलील यांच्या ऑफिसबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलील यांनी नमाज पडण्यासाठी जाऊ नये यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्नही केले. त्यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

Latest News