पुणे: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर पोलिसानी अटक केली


पुणे – कपड्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर पोलिसानी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार कोयत्यासह दरोडा टाकण्यासाठी लागणारी कटावणी, कटर स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य जप्त केले. किरण सुभाष धनगर (20 ), श्रीकांत राम शितोळे (21 ) आणि साहिल आयुब शेख (19 तिघे रा. भेकराई नगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या 5 अल्पवयीन मुलांनाही पोलिसानी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथक मंगळवारी पहाटे गस्त घालत होते. यावेळी युवकाचे टोळके फुरसुंगी उड्डाणपुलाजवळ आहे आणि ते कपड्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती कर्मचारी नितीन मुंढे, प्रशांत टोणपे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपीना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कपड्याचे दुकानावर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून कोयते जप्त केले इतर मुद्देमाल असा 41 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलीस कर्मचारी राजेश नवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, चिवळे आणि प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.