भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय, केवळ ब्राह्मणांच्या मतांवर नाही – रामदास आठवले

मुंबई | सध्या समाजात दलित अत्याचारांच्या वाढत्या घटनांवरून रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी आरोप केला आहे. तसेच आठवलेंनी लोकसभा निवडणुकीच्या विजयाबाबत एक वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवता आला. मात्र हा विजय केवळ ब्राह्मणांच्या मतांवर नाही तर भाजपला सर्वांनी मतं दिली, यामध्ये दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांचा समावेश असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आठवले ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
दलित अत्याचाराच्या घटनांवरून भाजपला दोष देणं योग्य नसून यासाठी समाजाची धारणा दोषी आहे. भाजपशासित प्रदेशात दलित अत्याचारांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता दलित चांगले कपडे घालू लागला आहे. तो आता कोणालाही वाकून नमस्कार करत नाही. मात्र याच रागातून दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारांचा विषय आहे. त्यामुळे भाजपमुळे होतं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार असल्याचं म्हणत आठवलेंनी भाजपची पाठराखण केली आहे.