उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात त्यांनी तेवढा वेळ तरी काम करावं!


मुंबई | पुण्यातील ‘टीव्ही 9 चे’ पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर यांना आपला जीव गमवावा लागला. यावरून मुख्यमंत्र्यांनी आतातरी घराबाहेर बाहेर पडावं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
भाजपने मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत एकसारखीच आहे. मोदी पंतप्रधान कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा? असं राऊत यांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात त्यांनी तेवढा वेळ तरी काम करावं, असा टोला भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. काम होण्याशी मतलब आहे. ‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावं, असं म्हणत राऊतांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.