पुण्यात मोबाइलला चोरट्याने केला खून

पुणे: मोबाईल चोरट्यांनी स्वारगेट बस थांब्यावरील एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर चोरट्यांनी मोबाईल व रोकड चोरून नेला आहे. चोरीला विरोध केल्याने तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याजवळच खून झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नागेश दगडू गुंड (वय 37 ) असे खून झालेल्याचे नाव आहे. कमलाकर घोडके (वय 29) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश हा मूळचा तुळजापूर येथील आहे. तो बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होता. सध्या लॉकडाऊन असल्याने तो कुटुंबासोबत गावी गेला होता.
मात्र त्याला आज बावधन येथून नाशिकसाठी बदली काम मिळाले होते. त्यामुळे तो काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात आला होता. बसमधून उतरल्यावर तो कोथरूडमध्ये राहत असलेल्या कमलाकरच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबला होता. बस नसल्याने त्याने मित्राला फोन करून बोलावले होते. मात्र त्याचवेळी मोपेडवरून आलेल्या दोन चोरट्यांनी नागेशचा मोबाईल आणि पैसे पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध केल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या मांडीवर शस्त्राने वार केले. यानंतर त्याच्या खिशातील रोकड आणि मोबाईल चोरून नेला. फिर्यादी मित्र त्याला नेण्यासाठी आला असता नागेश दिसला नाही. काही अंतरावर नागेशने अंधारातून आवाज देत कमलाकरला बोलावले. त्यावेळी नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच कमलाकरने तात्काळ स्वारगेट पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत त्याला रुग्णालयात नेले. पण नागेश याचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला.
घटनेमुळे मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ आणि त्यांची वाढणारी दशहतीने प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेटसारख्या चौकात मोबाईल चोरटे वार करून लूटत असतील तर शहराची परिस्थिती काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.