पिंपरी : महिनाभरात 17 गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या – स्वाती शिंगाडे

कामशेत – गावठी दारू स्वस्त व सहज उपलब्ध होत असल्याने ‘लॉकडाऊन’च्या काळात मद्यपींकडून गावठी दारूची मागणी वाढत असल्याने, लॉकडाऊनच्या काळात मावळात गावठी दारूच्या हातभट्टयाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ऑगस्ट महिन्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने 17 अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात मावळातील पथरगाव, ओझर्डे, कडधे, शिरगाव, नायगाव, डोंगरगाव आदी ठिकाणच्या 17 गावठी दारू भट्ट्यांवर कारवाई करत गावठी दारू भट्ट्यांची विल्हेवाट लावली आहे. मात्र या गावठी दारू भट्ट्यांवर कारवाई होत नसल्याने कारवाईनंतर देखील या गावठी दारू भट्ट्या पुन्हा सुरू होत आहेत. मावळात मोठया प्रमाणावर गावठी दारू भट्ट्या, अवैधरित्या परराज्यातील मद्यविक्री तसेच हॉटेल व चायनीज टपऱ्यांवर राजरोसपणे अवैधरित्या मद्याची विक्री केली जाते, यावर ठोस कारवाई होत नसल्याने अवैधरित्या मद्य विक्रीचा व्यवसाय फोफावत आहे. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून गावठी दारू भट्ट्यांवर ठोस कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे. बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहोत.
– स्वाती शिंगाडे, उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.