पुण्यातील धक्कादायक प्रकार: पाठलाग करत महिलेचे मंगळसुत्र हिसकावले


पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून मोटारसायकलवरुन चोरटे पळून गेल्याच्या अनेक घटना शहरात नियमित घडत असतात. पण आता हे चोरटे थेट इमारतीच्या जिन्यांपर्यंत पाठलाग करुन ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावुन नेऊ लागले आहेत. वडगाव बुद्रुक येथील सुंदर पार्क सोसायटीत शुक्रवारी हा प्रकार घडला.
याप्रकरणी ६८ वर्षांच्या महिलेने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सकाळी सव्वा दहा वाजता दुध आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. दुध घेऊन त्या परत घरी येत होत्या. त्यावेळी इमारतीच्या जिन्याकडे त्या जात असताना अचानक एक जण त्यांच्या मागोमाग आला.त्या थांबल्या. तेव्हा त्याने फिर्यादींना तुम्ही अगोदर चला मी मागून येतो, असे सांगितले व त्यांच्या मागे थांबला.
त्यामुळे या महिला जिना चढण्यास सुरुवात करु लागल्या. त्यांनी पहिली पायरी चढत असताना मागे असलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसका मारुन जबरदस्तीने तोडले व तो पार्किंगमधून बाहेर पळत गेला. तेथून तो मोटारसायकलवर बसून सिंहगड रोडच्या दिशेनेन पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक के़ एस़ तनपुरे अधिक तपास करीत आहेत.