पुण्यात रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता 1000 दंड

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चाललेला असतानाही नागरिकांमध्ये अद्यापही गांभीर्य आलेले दिसत नाही. रस्त्यावर गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाणही वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने आता या थुंकी बहाद्दरांविरुद्ध मोहिम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आता थेट एक हजारांचा दंड केला जाणार आहे.यापूर्वी १०० रुपयांचा दंड आकारला जात होता.

पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,अस्वच्छता करणे, घाण करणे अशा कृतीसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. दंडात्मक कारवाई करुनही नागरिक रस्त्यावर थुंकणे बंद करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारीही केल्या जात आहेत.त्यामुळे दंडाची रक्कम आता एक हजार रुपये करण्यात आली आहे. तसे पत्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेला पाठविले होते. पालिका आयुक्तांकडून याबाबतचे आदेश शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.
====
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास यापुर्वी १०० रुपयांचा दंड आकारला जात होता. यापुढे ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांना दंड आकारणीचे वपुढील कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. यासोबतच पालिकेचे सर्व उप अभियंता,

कनिष्ठ अभियंता, प्रमुख उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरिक्षक, परवाना निरीक्षक, मैंटेनेन्स सर्व्हेअर व कार्यालयीन अधिक्षक यांना या शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये व खाजगी कार्यालयांमध्ये कोणतीही व्यक्ती मास्क परिधान न करता संचार करताना आढळल्यास दंड आकारण्याच्या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. ही कारवाई अधिक प्रभावी व परिणामकारक होण्याच्या दृष्टीने सर्व पोलिसांनाही हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

Latest News