पुणे: निवृत्त पोलीस निरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत चार नागरिकांना चिरडले.

पुणे – एका निवृत्त पोलीस निरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत चार नागरिकांना चिरडले. यामध्ये एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालेवाडी पसिरात दुपारी घडली. याप्रकरणी कारचालक निवृत्त पोलीस निरीक्षकास ताब्यात घेण्यात आले आहे. बालेवाडीतील ममता चौकात ही घटना घडली. संतोष राठोड (वय 35, रा.काळेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, राजेश सिंग (वय 37, रा. ताथवडे), आनंद भांडवलकर (वय 35, बाणेर), दशरथ माने (रा.बाणेर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक एस.डब्ल्यु.निकम यास ताब्यात घेतले आहे. निकम हा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आहे. ते त्यांच्या व्होक्सवॅगन पोलो कारमधून चालले होते.

रविवारी दुपारी आरोपी निकम हा बालेवाडी येथील हायस्ट्रीट येथून कार घेऊन जात होता. मद्यपान केल्याने निकमचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली एक व्यक्त खाली पडली. कारमध्ये दुचाकी अडकल्याने दुचाकीस्वाराला कारने काही मीटर फरफटत नेले. अखेर निकमच्या ताब्यातील कार ममता चौकात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका पंक्चरच्या दुकानामध्ये घुसली. दुकानामध्ये पंक्चर काढणारा मुलगा आणि अन्य दोघे असे तिघेजण होते, कारने त्या तिघांनाही उडविले, त्यानंतर जवळच थांबलेल्या टेम्पोला कारची धडक देऊन कार थांबली. दुकानातील तिघे अपघातात जखमी झाले तर दुचाकीवरील संतोष याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासमवेत असणारा दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी निकम याला ताब्यात घेऊन जबर चोप दिला.

या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, दत्ता शिंदे आणि पोलीस नाईक बानगुडे यांनी निकम याची नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Latest News