उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा :मायावती

हाथरस येथील सामूहिक बलात्कार घटनेतील पीडितेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. ज्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचा चेहरा देखील पाहता आला नाही. यासर्व प्रकरणावर बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या राजीनाम्याची तसेच राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवला. ‘योगी आदित्यनाथ यांना मी आठवण करून देते की त्यांनी एका मातेच्या उदरात जन्म घेतला आहे. दुसऱ्यांच्या बहिणी आणि मुलींना त्यांनी आपल्या बहिणींसारखे मानले पाहिजे. जर तुम्ही त्यांचे रक्षण करू शकत नसाल तर तुम्ही स्वत: मागे हटून पदाचा राजीनामा दिला पाहिजे’, असं मायावती म्हणाल्या. तसेच सध्याचे यूपीचे मुख्यमंत्री हे सरकार चालवण्यास सक्षम नसल्याचे सांगतानाच त्या म्हणाल्या की, नेतृ्त्वात बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही हे करू इच्छित नसाल तर राष्ट्रपती शासन लागू करावे. कमीत कमी उत्तर प्रदेशच्या जनतेवर तरी दया करा, अशी माझी विनंती असल्याचं मायावती म्हणाल्या

दरम्यान, भाजपकडून बोलताना मुख्तार अब्बास नक्वी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. हाथरस घटना दुखद आहे. मात्र याचं कुणी राजकारण करू नये. योगी सरकारने वेगानं तपास सुरू केला असून आरोपींना कठोर शासन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Latest News