देशात अराजक माजलं आहे- सुप्रिया सुळे

मुंबई: देशात अराजक माजलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. यूपीत कायद्याचं राज्य नाही. दडपशाही सुरू आहे, असं सुनावतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी असून योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकाराबद्दल स्वत:ची चूक कबूल करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेवरून योगी आदित्यनाथ सरकारला सुनावलं आहे. हाथरस येथील घटना अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या दोन्ही बलात्काराच्या घटना हे योगी सरकारचं अपयश आहे. त्याची जाणीव योगी सरकारला व्हायला हवी. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.
राहुल गांधी यांना काल हाथरसला जाताना पोलिसांनी धक्काबुक्की केली. प्रियांका गांधी यांनाही यमुना एक्सप्रेसवेवर रोखण्यात आलं. या साऱ्या घटना दुर्देवी असून त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असंही त्या म्हणाल्या. (supriya sule reaction on hathras gang rape)
सत्तेच्या मस्तीत वागणारे धाराशाही होतील: केदार
दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनीही उत्तर प्रदेशातील योगी सरकारविरोधात हल्ला चढवला. सत्तेच्या मस्तीत राहणाऱ्यांना काँग्रेस धडा शिकवणारच. सत्तेच्या मस्तीत वागणारे धाराशाही होतील, असा इशारा सुनील केदार यांनी दिला. वर्धा सेवाग्राम येथील बापू कुटीत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले असता सुनील केदार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही अहिंसेच्या माध्यमातून त्यांना चोख उत्तर देऊ. अहिंसा आणि हिंसा यातील फरक जर यांना समजत नसेल तर त्यांना अहिंसेतून धडा शिकविलाच पाहिजे, असं सांगतानाच महात्मा गांधी यांनी सांगितलेली अहिंसाच या देशाला पुढे नेऊ शकते, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येकाने आपल्या जीवनात अहिंसेचा मार्ग अवलंबावा, असं आवाहनही त्यांनी केलं.