स्मार्ट सिटीच्या वतीने सायक्लोथॉन व वृक्ष लागवड

स्मार्ट सिटीच्या वतीने सायक्लोथॉन व वृक्ष लागवड
पुणे : स्वावलंबन, निरोगी जीवनशैली, तसेच कोविड -19 संबंधी जनजागृती करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बाणेर येथे नागरिकांच्या सहभागातून सायक्लोथॉन व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच, स्मार्ट स्कूल्समध्ये शालेय स्तरावर स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाचा समारोप व 151 व्या जयंतीचे औचित्य साधून पुणे स्मार्ट सिटीकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये स्मार्ट सिटीकडून बाणेर बालेवाडीतील ज्युपिटर हॉस्पिटल ते लक्ष्मीमाता मंदिर यादरम्यान विकसित करण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्यावर सायक्लोथॉन व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बकुळ, मोहोगणी अशा विविध देशी प्रजातींच्या 160 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी या भागातील नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे, शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, तसेच इतर प्रमुख अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.