पुणे : पोलीसांची विनामास्क कारवाई करताना दादागिरीची भाषा


माझं डोकं गरम करु नको, जास्त शहाणपणा करतो काय, तुला इंगा दाखवू काय, वाद घालू नको, वाईट परिणाम होतील, पोलिसांचा हिसका दाखवू का, अशापद्धतीने सर्रास पोलिसांकडून विमामास्क कारवाईदरम्यान पुणेकरांना गुन्हेगारी पद्धतीची वागणूक दिली जात असल्याचे पाहणीतून उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या जीभेला आवरणार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.शहरातील विविध भागात पोलिसांकडून विनामास्क कारवाई करताना दादागिरीची भाषा वापरली जात असल्याचे दिसून आले आहे. नागिरकांकडून संबंधित पोलिसांना उत्तरे देताना थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे शहरात खून, खूनाचा प्रयत्न, सोनसाखळी हिसकाविणे, घरफोड्या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दुसरीकडे मात्र, कर्मचाऱ्यांसह अधिकारी बेसिक पोलिसिंग विसरुन नागरिकांशी वादावादी घालत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांकडून प्रतिउत्तर ऐकून घेण्याची मानसिकता कोणत्याही पोलिसांकडे नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पावत्यांचे टारगेट पुर्ण करण्यासाठी सर्रासपणे कारवाईच्या नावाखाली नागरिकांना धमकी दिली जात आहे. कारवाईच्या नावाखाली वानवडी, खडक, शिवाजीनगर पोलिसांकडून नागरिकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचे पाहणीतून उघड झाले आहे.
दुचाकीच्या चावी काढण्यावर पोलिसांचा डोळा
कारवाईदरम्यान पोलिसांकडून प्रवाशी दुचाकीस्वारांच्या चाव्या काढून घेण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत असून पाठीमागून वेगात येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कारवाई करा पण अपघात झाल्यास जबाबदार कोण अशी विचारणा नागरिकांनी केली आहे.
विनामास्क कारवाईदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी अर्वाच्य भाषेत बोलणे चुकीचे आहे. त्यासंदर्भात सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, प्रभारी गुन्हे शाखा
कुटुंबीयांसह मोटारीतून पुण्यात येत असताना 29 सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास भैरोबानाला परिसरात वानवडी पोलिसांनी अडवून अरेरावी केली. मोटार थांबविल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याने अर्वाच्य भाषेत आम्ही गुन्हेगारांसारखी वागणूक देत उद्धटपणे विचारणा केली. पोलिसांनी नागरिकांशी चांगल्या भाषेत बोलणे आवश्यक आहे.
– शार्दूल जमाले, नागरिक