सम्राट अशोकाच्या विचारांचे प्रचारक तथा आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून परिचित असलेले डॉ. अशोक शिलवंत यांचे आज निधन

Bhau_closeup

पिंपरी – संत तुकारामनगर येथील अशोक सहकारी बॅंकेचे संस्थापक, सम्राट अशोकाच्या विचारांचे प्रचारक तथा आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून परिचित असलेले डॉ. अशोक शिलवंत यांचे आज (शुक्रवारी) सकाळी अल्पश: आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.

अशोक शिलवंत यांना काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वी मातही केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. अशोक बॅंकेचे चेअरमन राजरत्न शिलवंत व नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे ते वडील होत.

अशोक शिलवंत यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक कार्यात मोलाचे योगदान होते. सम्राट अशोक यांच्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेल्या अशोक सर्वांगीण सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी ‘अशोक स्तंभा’ची महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील अनेक राज्यात उभारणा केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंत नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून शोक व्यक्त होत आहे.

Latest News