आधी मास्क वर घे आणि नंतर बोल- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पूर्णपणे दक्षता घेताना आवर्जून पाहायला मिळतात.अगदी मंत्रालयातील बैठकीपासून ते अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसह कुठल्याही दौऱ्याच्या प्रत्येक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे ते अगदी कटाक्षाने पालन करतात. तसेच इतरांनाही ते करण्यास भाग पाडतात. यावरून आतापर्यंत त्यांनी अनेकांची थेट कानउघाडणी केल्याचे चित्र देखील वेळोवेळी बघायला मिळाले आहे. शुक्रवारी ( दि. ९ ) देखील पुण्यात एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याचा अनुभव आला. ‘आधी मास्क वर घे आणि नंतर बोल’ अशा कडक शब्दात अजित पवारांनी या कर्मचाऱ्याचे चांगलेच कान टोचले.

पुण्यात विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चारचाकी वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून पवार माहिती घेत असताना एका सरकारी कर्मचाऱ्याला त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचा प्रत्यय आला.

कोरोनाच्या काळात अजित पवार अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. कधी माध्यमांशी बोलण्यापूर्वी चॅनेलच्या बुमवर सॅनिटायझर फवारणे किंवा प्रतिनिधींना माईक दूर धरण्याची सूचना असो ते नेहमी दक्षता घेण्याच्या पावित्र्यात असतात. पवार फक्त प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वा अधिकारी यांच्यासोबतच नव्हे तर इतर राजकीय नेते, मंत्री यांनी देखील कोरोनाबाबतच्या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करावे यासाठी नेहमीच आग्रही असतात.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत अजित पवार माहिती घेत होते. त्यावेळी इस्त्रायलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेलेला एक कर्मचारी माहिती देत असताना अजित पवारांनी त्याला मध्येच थांबवत आधी तोंडावरती मास्क घे आणि नंतर बोल असा सज्जड दम भरला. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांकडे बघत आपले मास्क वरती घेण्यास सुरुवात केली.

अजित पवार घेतात काळजी मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यकर्ते बिनधास्त..
कोरोना कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेत आहेत. मास्क, हातमोजे सतत ते परिधान करतात. जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या बैठकीत काळजी घेतात. अधिकाऱ्यांना सूचना देतात. पवार हे नियम पाळत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना विसर पडला आहे. कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे.

Latest News