एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण

पुणे : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. तर, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती परीक्षा रद्द करण्यात यावा यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजेंसह मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील दिला होता.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मराठा समाजाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. तर काल संध्याकाळी एकूणच कोरोनाची परिस्थिती व मराठा समाजाचा वाढता विरोध बघता राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावर पुण्यामध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर ‘मातोश्री’मध्येच बसलेले असतात” अशी बोचरी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार?, अशी प्रश्नांची सरबत्ती करत एक महिना झाला पण हे सरकार काही ही करत नाही हे, सरकार कोविड बाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिलावरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही” असा आरोप देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

Latest News