आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे 5000 कोटीनी खर्च वाढला


मुंबई: मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. भाजप सरकारच्या काळात पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. मात्र, महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मेट्रोची कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. आरे कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित झाल्यास या प्रकल्पाची किंमत 5 हजार कोटींनी वाढेल. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील.
कारशेड कांजूरमध्ये गेल्यामुळे आता मेट्रो ट्रेनच्या पार्किंगसाठी रोज आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठीच्या खर्चातही वाढ होईल. तसेच सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे? मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीवर? या जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवादांचा विरोध झुगारत एका रात्रीत कारशेडसाठी आवश्यक असलेली सर्व झाडे तोडून टाकली होती. यानंतर मुंबईत जनक्षोभ निर्माण झाला होता. मात्र, मेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यतेसाठी आरेत कारशेड होणे गरजेची असल्याच्या भूमिकेवर फडणवीस सरकार शेवटपर्यंत ठाम राहिले होते.
कांजूरमार्गमधील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन- मुख्यमंत्री
कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.