भाजपशासित राज्यातील मंदिरं उघडण्याचा सल्ला द्या -अस्लम शेख

aslam-sekh

मुंबई : राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप 13 ऑक्टोबर रोजी राज्यभरात आंदोलन करणार आहे. मात्र इतक्यात मंदिरे सुरू करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर भाजपकडून टीका केली जात असताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोव्हिडचा प्रसार महाराष्ट्रात आणि देशात झपाट्याने होत आहे. भाजपने त्यांचे जेथे मुख्यमंत्री आहेत अशा राज्यांना मंदिरं उघडण्याचा सल्ला द्या, असं प्रत्युत्तर अस्लम शेख यांनी दिलं आहे. आम्हाला धार्मिक स्थळ उघडण्यात कोणतीच अडचण नाही. परंतु आम्हाला लोकांची काळजी आहे. हे सरकार लोकांची काळजी घेणारं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी लोकांची काळजी घेण्यात हे सरकार कमी पडणार नाही”, असं शेख म्हणाले.

“कोव्हिडचा प्रसार महाराष्ट्रात आणि देशात झपाट्याने होत आहे. कोव्हिडच्या संख्येत आपण जगात 2 नंबरला आहोत. हे तरी कमीत कमी विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं. मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तिथे त्यांनी मंदिरं उघडण्याचा सल्ला द्यावा”, असं अस्लम शेख म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंदिरं घाईघाईत सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गर्दी करू नका म्हणून मी सर्वांना आवाहन करत आहे. सणासुदीतही हे आवाहन केलं होतं. सर्व धर्मीयांनी माझं म्हणणं ऐकलं. आता दिवाळी आणि नवरात्र येत आहेत. त्यामुळे या काळातही आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. तोंडाला मास्क लावणं हे बंधनकारक आहे. इतर सणांप्रमाणेच येणाऱ्या सणांच्यावेळीही सर्वांनीच खबदारी घ्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मंदिरं उघण्याबाबत हळूवार पावले टाकतोय- मुख्यमंत्री

राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरू झालं, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी शांत बसावे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. आम्हाला जनतेची काळजी आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालण्याची सवय नाही. आपण सर्व दारे हळुवार उघडतोय. या दारांतून सुबत्ता आणि समृद्धी आली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास या दारांतून कोरोना शिरेल. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या मंदिर भूमिकेवर भाजपची टीका

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या मंदिराबाबतच्या भूमिकेवर भाजपने टीका केली. राज्यातील बार सुरु आहेत. मात्र मंदिरं उघण्याबाबत सरकारला अनास्था आहे. यावरुनच या सरकारच्या भावना लक्षात येतात. ‘बंद मंदिरं उघडी बार, उद्धवा अजब तुझे सरकार’, असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

मदिरालये उघडण्यास परवानगी देणाऱ्या महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास मात्र अजून परवानगी दिलेली नाही. या विरोधात 13 ऑक्टोबर रोजी भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे. भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे मंदिर पुन्हा उघडली जावीत, या मागणीसाछी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत.

Latest News